Wednesday, July 10, 2024

बाळूमामा

 

बालपण – बाळूमामा इतिहास – balumama history

बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अक्कोळ इथल्या जैन व्यापारी चंदूलाल शेठजी यांचेकडे चाकरीला ठेवले. शेठजी कुटूंबीयांकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होवून, बहीण गंगुबाई हि-याप्पा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले. त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत. तेंव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले.

उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून दोन साधुना तृप्त केले. साधुनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. बाळूमामांच्या इच्छेविरूद्ध पण आई-वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगुबाईची मुलगी सत्यव्वा बरोबर त्यांचा विवाह झाला. दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले. फिरता संसार सुरू झाला.

बकरी चारत असताना अरे बाळू, तू गुरू करून घे…अशी आकाशवाणी झाली. तेंव्हा बाळूमामांनी ठरवले की, मी भुते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गूरू करून घेईन. काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले, अरे बाळू, भुते काढलेले १२० रूपये मला दे…हे उद्गार ऐकून मामांनी गुरू म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले.

लग्नानंतर सुमारे ९ वर्षांनी सत्यव्वा गरोदर राहिली. पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला. तेंव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला. मामा बक-यांचा कळप घेवून महाराष्ट् आणि कर्नाटकात गावोगावी जात असत. त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिध्दीस आले.

किर्ती किंवा प्रसिद्धीसाठी त्याना हाव, अपेक्षा नव्हती. भक्तांच्या भल्यासाठी, कल्याण्यासाठी प्रसंगानुसार त्यानी काही चमत्कार घडवले. पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती. कानडी व मराठी ग्रामिण बोली भाषेत ते सर्वांना न्याय, निती, धर्माचरणाचा उपदेश करीत असत. प्रसंगी शिव्या देत. त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच असत.

लहनापासून थोरापर्यंत, गरीबापासून श्रींमतापर्यंत व अडाण्यापासून विद्वानापर्यंत सर्व थरांतील स्त्री-पुरूष त्यांचे भक्त होते व आहेत.शर्ट, धोतर फेटा, कांबळा, कोल्हापूरी चप्पल हा त्यांचा पेहराव…भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे. ऊन, वारा, पाऊस किंवा थंडी असो..बक-यांसवे शिवारातचं त्यांचा मुक्काम असे.गोरगरिबांना अन्नदान व्हावे, ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी १९३२ सालापासून भंडारा उत्सव चालू केला.