तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. एकूण पाच मंडळांमध्ये या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे.
पुणे
स्थापना : १९०१ उत्सवी वर्ष : शतकोत्तर चौदावे


कल्पक, भव्य आणि नावीन्यपूर्ण देखाव्यांसाठी तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ओळखले जाते. १९०१ साली हे मंडळ स्थापनेत दातार काँट्रॅक्टर, कावरे आईस्क्रीमवाले, सदाशिवराव तथा बुवा पवार, आबा खटावकर, बोलोबा वाळके, बंडोपंत ढवळे, हरिभाऊ शेटे, वामनराव ताम्हणकर, डॉ. रंगनाथ सोमण, गणपतराव वनारसे, दिवेकर, खटावकर यांचा सहभाग होता. स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सवात पोवाडे, मेळे, समाज जागरणाचे कार्यक्रम गणेशोत्सवात आयोजित केले जात. अनेक मान्यवर लोकांची भाषणे, लोकनाटय़ेदेखील होत असत. थोर शास्त्रीय गायकांचे गायनदेखील येथे झाले आहे.
१९५२ साली प्रा. डी. एस. खटावकर यांनी मांडलेल्या संकल्पनेमुळे मंडळाच्या उत्सवाला कलाटणी मिळाली. तुळशीबाग गणपतीच्या पुढे त्यांनी सजावटीची देखाव्यांची योजना केली. नौकावहन करणारा गणपती, काचेचा गणपती, नटराज गणपती अशी रचना सजावट त्यांच्या माध्यमातून सुरू झाली. १९७५ साली खटावकर यांनी प्रथम फायबर ग्लास वापरून गणेशाची कायमस्वरूपी मूर्ती तयार केली. त्यावेळी अजंठा-वेरुळ लेण्यांचा भव्य देखावा मांडला होता. त्यातूनच तुळशीबाग गणेशोत्सवाची भव्य देखाव्यांची परंपरा सुरू झाली.
तुकारामाचे वैकुंठगमन, भीम-धृतराष्ट्र, अहिरावण-महिरावण, अमृतमंथन असे अनेक गाजलेले देखावे मंडळाने सादर केले आहेत. खटावकर हे मंडळाचेच असल्यामुळे मानधन न घेता ते दरवर्षी सजावटीचे काम करायचे. कार्यकर्त्यांचा देखील त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग असायचा. साधारण १९९० नंतर उत्सवात तयार देखावे आणले जाऊ लागले. सुरुवातीच्या काळात हरिभाऊ कावरे, अप्पासाहेब तुळशीबागवाले, एकनाथ मते यांनी मंडळाची धुरा वाहिली, तर मोहन साखरिया, राजू पवार, दत्ताभाऊ कावरे हे नंतर कार्यरत झाले. शताब्दी वर्षांत प्रा. डी. एस. खटावकर यांना अध्यक्षपदाचा मान देण्यात आला. गेल्या चौदा-पंधरा वर्षांत देखाव्यात बदल होऊन स्थिर देखावे, म्युरल्स या प्रकारांनी घेतली आहे. 

No comments:

Post a Comment