केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर पाच मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीत मानाचे स्थान आहे.
 गणपती मिरवणूकीत पाचवा असतो.
नारायण पेठ, पुणे
स्थापना : १८९४ उत्सवी वर्ष : शतकोत्तर एकविसावे
टिळकांच्या मूळ उद्देशाला धक्का न लावता, अत्यंत पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याची प्रथा आजवर केसरीवाडय़ाने कटाक्षाने पाळली आहे. १९०५ साली गायकवाड वाडय़ात हा उत्सव साजरा होऊ लागला तेव्हापासून अनेक दिग्गजांची येथे व्याख्याने झाली आहेत. त्या वर्षीच टिळकांनी ‘देह आणि आत्मा’ या विषयावर व्याख्यान दिले होते. न. चिं. केळकर, कृष्णाजीपंत खाडिलकर, चिंतामणराव वैद्य, चि. ग. भानू, शि. म. परांजपे आदी थोर लोकांनी येथे व्याख्याने दिली आहेत. व्याख्यानांची ही परंपरा आजही पाळली जात असल्याचे केसरी ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष दीपक टिळक सांगतात. येथे हजेरी लावलेल्या व्याख्यात्यांच्या नावांवर नुसती नजर टाकली तरी या गणेशोत्सवात किती मोठा ज्ञानयज्ञ सुरू असायचा याची कल्पना येऊ शकेल. सामाजिक, राजकीय, आरोग्य, अध्यात्म अशा अनेकविध विषयांवर अनेक मान्यवरांनी आपल्या विचारांची कवाडे येथे खुली केली आहेत आणि आजही तीच परंपरा जोपासली जातआहे. त्याचबरोबर अनेक थोर शास्त्रीय गायक-गायिकांनीदेखील या गणपतीपुढे आपली सेवा अर्पण केली आहे.
केसरी वाडय़ाच्या गणपतीला लोकमान्यांचे वलय तर आहेच, पण त्याबरोबरच या गणपतीला आपसूकच नेतेपण देखील लाभले होते. सार्वजनिक गणेशोत्सवाला मार्गदर्शक अथवा नियंत्रक असावा या उद्देशाने ‘पुणे गणेश मंडळा’ची स्थापना येथेच झाली. हे गणेश मंडळ पुढे अनेक वर्षे कार्यरत होते. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या हीरक महोत्सवी वर्षांत याच मंडळाकडून सार्वजनिक गणेशोत्सवांचा आढावा घेणारा एक उत्तम दस्तऐवज ग्रंथरूपाने तयार झाला.
कालौघात सर्वत्र उत्सवाचे स्वरूप बदलेले असले तरी या केसरीवाडा गणेशोत्सवाने पारंपरिकतेला तडा जाऊ दिला नाही. गेल्या काही वर्षांपासून व्याख्यांनाबरोबरच लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, महिलांसाठी पाककला आणि पुष्प सजावट स्पर्धा असे उपक्रम मंडळातर्फे घेतले जातात. लोकमान्य टिळकांची परंपरा लाभलेला गणेशोत्सव म्हणून केसरीवाडय़ाच्या गणपतीचे महत्त्व कायमस्वरूपी टिकून राहणारे आहे.

No comments:

Post a Comment