तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर चार मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे
पुणे
स्थापना : १८९३ उत्सवी वर्ष : शतकोत्तर बाविसावे

अत्यंत शिस्तबद्ध आणि जल्लोषपूर्ण उत्सवासाठी जी काही मोजकीच मंडळे प्रसिद्ध आहेत त्यांमध्ये तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सवाचे नाव मानाने घ्यावे लागते. पुण्यातील मानाच्या पहिल्या पाच गणपतींमध्ये तांबडी जोगेश्वरीचा दुसरा क्रमांक आहे. स्वत: लोकमान्यांनी ग्रामदेवता जोगेश्वरीच्या सन्मानार्थ या मंडळाला मिरवणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा मान दिला आहे. यंदा हे मंडळ १२२वे वर्ष साजरे करत आहे. 
स्थापनेपासूनच तांबडी जोगेश्वरी मंडळाने गणेशोत्सव धार्मिक आणि शिस्तबद्धपणे साजरा करण्याची प्रथा जोपासली आहे. १२२ वर्षे या मंडळाचे मूर्ती तयार करण्याचे काम वंशपरंपरेने गुळणकर घराण्याकडे असून आज त्यांची चौथी पिढी या कामी कार्यरत आहे. सुरुवातीच्या काळात पारंपरिक मेळे, कीर्तन यांचा मुख्यत: समावेश राहिला आहे. १९४० पर्यंतच्या काळात हा उत्सव बेंद्रे आणि घोरपडकर कुटुंबीय आणि मंदिर परिसरातील नागरिकांचा घरगुती उत्सव असल्यासारखे होते. पण त्यानंतरच्या काळात खूप मोठय़ा प्रमाणात आजूबाजूंच्या लोकांमधून अनेक कार्यकर्ते लाभले. अनेक नामवंत गायक-गायिकांनी, व्याख्यात्यांनी मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये आवर्जून हजेरी लावली आहे. 
शताब्दी महोत्सवापर्यंत मंडळाला सरदार नातूंकडून विसर्जन मिरवणुकीसाठी मानाची पालखी मिळत असे. तर शताब्दी महोत्सवात मंडळाने श्रीच्या विसर्जनासाठी चांदीची स्वत:ची पालखी तयार करून घेतली.त्यापाठोपाठ मंडळाने मूर्तीसाठी तब्बल ५५ किलो चांदीपासून तयार केलेला देव्हारा बनवून घेतला आहे. 
महत्त्वाचे म्हणजे मंडळाने आपणहून वर्गणीसाठी विभागाची मर्यादा घालून घेतली आहे. अर्थात वर्गणीसाठी कोणतेही बंधन नसल्यामुळे अनेक भक्त, कार्यकर्ते उत्सव मंडपातच आपणहून वर्गणी जमा करत असतात. त्यामुळे मंडळाने वर्गणी मागणे बंद केले असून उत्सवादरम्यान मंडपातच तिचे संकलन होते.
सजवलेल्या चांदीच्या पालखीतून काढण्यात येणारी मिरवणूक हा अत्यंत देखणा सोहळा असतो. किंबहुना त्यामुळेच मंडळाला आजवर उत्कृष्ट मिरवणुकीसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तर १९९७ साली सादर केलेल्या रँडच्या खुनाच्या जिवंत देखाव्याला ‘लोकसत्ता’चे पहिले पारितोषिक मिळाले आहे. विसर्जन मिरवणुकीतील मूक-बधिर विद्यार्थ्यांचा सहभाग हे या मंडळाचे आणखीन एक वैशिष्टय़ म्हणावे लागेल. कामायनी सुहृद मंडळ शाळेतील मूक-बधीर विद्यार्थी दर वर्षी मिरवणुकीत सहभागी होऊन उत्सवाचा आनंद लुटतात. अशी ही वैशिष्टय़पूर्ण मिरवणूक वेळेत संपविण्याबाबत मंडळाची आजवर ख्याती राहिली आहे.

No comments:

Post a Comment